कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. मागील सभेला महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र, गोकुळच्या पुढील सभेला विरोधी महायुतीचे सर्व १२ संचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेच
गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत समविचारी आघाडीचे पारडे जड मानले जात आहे.
२९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिले. परिणामी, आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. गोकुळच्या उपविधीनुसार अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचा मुद्दा यावेळी पुढे आला.
पुढील सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
महायुतीच्या संचालकांच्या अनुपस्थितीमुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आता पुढील सभेला सर्व १२ संचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आगामी सुनावणी आणि पुढील सभेतील घडामोडी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोकुळच्या पुढील सभेत अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का आणि नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार का, याकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
