कराड, दि. ३० : कराड शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या विविध स्मारकांच्या सुशोभीकरणासाठीची कामे लवकरच सुरू होणार असून, त्याचा शुभारंभ १ जून रोजी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाने होणार आहे. हा सोहळा कराड येथील दत्त चौक, शिवतीर्थ येथे सकाळी ११ वाजता होणार असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

 

या विकासकामांसाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून तसेच यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या सततच्या पाठपुराव्याने कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. विशेषतः दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमास आमदार डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव, शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमात केवळ शिवतीर्थचे नव्हे, तर शहरातील इतर महत्त्वाच्या स्मारकांचाही समावेश करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा आणि अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या सुशोभीकरण व विकासकामांचे भूमिपूजन देखील या दिवशीच होणार आहे.

 

तसेच शुक्रवार पेठेतील जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेत मराठा समाज मंदिर, डवरी समाज मंदिर आणि स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या नियोजित इमारतींचेही भूमिपूजन होणार आहे. या कामांसाठी लागणारा निधी राजेंद्रसिंह यादव यांनी महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर मंजूर झाला आहे.

 

या महत्त्वाच्या कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असून, पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार या वेळी करण्यात येणार आहे.

 

या दोन्ही कार्यक्रमांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह यशवंत विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कराडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

ही सुरुवात केवळ स्मारकांच्या सुशोभीकरणापुरती मर्यादित न राहता, कराड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!