सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे दोन्ही राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आल्याने सांगली जिल्ह्यातील बावची येथील कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाषणांमधूनही एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संदर्भ देताना पडळकरांकडून झालेल्या चुकीवर जयंत पाटील यांनी थेट व्यासपीठावरूनच त्यांना सुनावले. ‘पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या. भाषणं पाठ करून केली की असं होतं,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकीयदृष्ट्या एकमेकांचे विरोधक असलेले जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर येणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पडळकर कार्यक्रमस्थळी दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याला जयंत पाटील यांच्या समर्थकांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी राजकीय वातावरण तापले. मात्र, जयंत पाटील यांनी स्वतः माईक हातात घेत समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक कार्यक्रमातील संस्कृती आणि शिष्टाचार जपण्याचा संदेश दिला.
दरम्यान, भाषणादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा उल्लेख करत जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अफजलखान लाखोंची फौज घेऊन आला होता; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा फाडला, असा उल्लेख करत त्यांनी अफजलखानाचा वध पन्हाळगडाच्या पायथ्याशी झाल्याचे सांगितले. याच ऐतिहासिक संदर्भातील चुकीवर जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोट ठेवले.
जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, अफजलखानाचा वध पन्हाळगडाच्या पायथ्याशी नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला होता. यानंतर त्यांनी पडळकरांना उद्देशून, ‘पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या. भाषणं पाठ करून केली की असं होतं,’ असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.
यावेळी जयंत पाटील यांनी राजकीय विरोधकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना समर्थकांना संयम राखण्याचा सल्लाही दिला. ‘कायम एक लक्षात ठेवायचं, कधी चिडायचं नसतं आणि आपली संस्कृती कधी सोडायची नसते. कोणाला काहीही करायचं असलं तरी आपली संस्कृती ही आहे की, आलेल्या माणसाची सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची,’ असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, पडळकरांच्या आगमनावेळी झालेली घोषणाबाजी शांत करण्यासोबतच त्यांचा सन्मान करण्याची भूमिकाही जयंत पाटील यांनी घेतली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा सुरू असतानाच या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे त्यांच्या भाषणातील टोलेबाजीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला देत सुरू झालेली ही राजकीय शाब्दिक चकमक अखेर जयंत पाटील यांच्या ‘अभ्यास करून या’ या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरली.
एकीकडे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, दुसरीकडे समर्थकांची घोषणाबाजी आणि त्यातच दोन राजकीय विरोधकांमधील टोलेबाजी, अशा विविध कारणांमुळे बावचीतील हा कार्यक्रम सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
