पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कुख्यात गुन्हेगार कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडेला आंध्रप्रदेशमधून अटक केली आहे. कल्याणी ही गांजा विक्री रॅकेटची मास्टरमाइंड असून, तिच्यावर यापूर्वी वेश्याव्यवसाय, खून आणि मकोका कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात पोलिसांनी तिच्या गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश करत तिचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे, चुलत जावई अभिषेक विकास रानवडे आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे यांना अटक केली होती. या कारवाईत 21 किलो गांजा आणि 11 लाख 27 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, कल्याणी तेव्हा फरार झाली होती. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिला आंध्रप्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक केली.
कल्याणी देशपांडे ही पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात नाव आहे. बाहेरून सुसंस्कृत आणि उच्चभ्रू वाटणारी कल्याणी गेल्या 25 वर्षांपासून वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय आहे. तिने पुण्यातील पाषाण-सूस रोडवरील कल्याणी कलेक्शन या दुकानातून आणि राहत्या घरातून गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. यापूर्वी तिने व्हीनस एस्कॉर्ट्स नावाची एजन्सी चालवत पुण्यातील आयटी कंपन्यांना हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसायासाठी मुलींचा पुरवठा केला. तिच्या या काळ्या धंद्याने पुण्यातील अनेक उच्चभ्रू परिसरांमध्ये खळबळ माजवली होती. 2007 मध्ये तिच्या पाषाण येथील बंगल्यात अनिल ढोले या सहकाऱ्याच्या हत्येनंतर तिचा वेश्याव्यवसाय प्रथमच उघडकीस आला. या प्रकरणाने तिचे हॉटेल व्यावसायिक आणि गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले मजबूत नेटवर्कही समोर आले.
कल्याणीवर डेक्कन, कोथरूड, चतु:शृंगी, हवेली, फरासखाना, विश्रामबाग आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यांत खून, अपहरण, बलात्कार, फसवणूक आणि अंमली पदार्थ विक्रीसह एकूण 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2005 मध्ये पुण्याबाहेरील एका हॉटेलमध्ये सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी तिच्यावर मकोका कायद्यांतर्गत पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला होता. 2012 मध्ये हिंजवडी पोलिसांनी तिला वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, ती दरवेळी जामिनावर सुटून पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवत होती. 2016 मध्ये कोथरूड येथील एका सोसायटीत हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवताना तिला आणि तिचा साथीदार प्रदीप गवळी यांना अटक झाली. या प्रकरणात विशेष न्यायालयाने तिला सात वर्षांची सक्तमजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तरीही, तुरुंगातून सुटल्यानंतर तिने गांजा विक्रीसारखा नवा गुन्हेगारी धंदा सुरू केला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बावधन येथील पाषाण-सूस रोडवर 24 मे 2025 रोजी छापा टाकून कल्याणीच्या साथीदारांना अटक केली होती. आता कल्याणीच्या अटकेमुळे तिचे गुन्हेगारी नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले की, शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सतत कार्यरत आहेत. कल्याणीच्या अटकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून, तिच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.