कराड : कराड शहर व परिसरात रिक्षा चोरीच्या घटना घडवत असलेले आरोपी प्रत्यक्षात अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. कराड शहर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत शहरातील व परिसरातील एकूण ९ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून तब्बल 13 लाख 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज, ऑटो रिक्षा, मोटारसायकल व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहर व परिसरात गेल्या काही काळापासून दिवसा व रात्री घरफोडी तसेच रिक्षा चोरीचे प्रकार सातत्याने घडत होते. या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
वरिष्ठांच्या सूचनांनुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी तपासाला वेग दिला. विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी, संशयित हालचालींचे विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून २ संशयित आरोपी (१ पुरुष व १ महिला) तसेच १ अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत सुरुवातीला त्यांनी रिक्षा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र पुढील तपासात मोठा खुलासा झाला. या आरोपींनी कराड शहर व परिसरात दिवसा व रात्री घरफोडीचे एकूण ९ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यातील आणखी एक विधिसंघर्षग्रस्त साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत आरोपींकडून सोन्याची लगड (दागिने), ऑटो रिक्षा, मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण 13,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड परिसरातही ३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने या टोळीचा गुन्हेगारी विस्तार मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कराड शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांवर मोठा आघात झाला असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. फरार साथीदाराच्या अटकेसाठी तपास पथकांचे प्रयत्न सुरू असून, लवकरच आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
