कराड : कराड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी गोडावून, मार्केटयार्ड, कराड येथे मतपेट्यांचे वाटप, जमा व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी मतपेट्या व साहित्य वाटप, 7 फेब्रुवारी रोजी सायं. 6.00 नंतर मतपेट्या जमा, तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

तसेच या कालावधीत मतदान कर्मचारी, झोनल अधिकारी व पोलीस कर्मचारी, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी, एस.टी. बसेस, चारचाकी वाहने तसेच उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गर्दी, वाहतूक कोंडी, अपघात अथवा कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत.

 

मुख्य वाहतूक बदल

विजय दिवस चौक ते भेदा चौक मार्ग सर्वसाधारण वाहनांसाठी बंद; वाहने दत्त चौक–पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापूर नाकाकडे वळविण्यात येतील.

कार्वेनाका बाजूकडून भेदा चौक प्रवेश बंद; वाहने गेट नं. 4–बैल बाजार रोड–मलकापूर–हायवे मार्गे जातील.

पोपटभाई पेट्रोल पंप ते भेदा चौक मार्ग मतदान प्रक्रियेतील वाहनांखेरीज बंद असून या मार्गावरून जाणारी वाहने शाहू चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक मार्गे एसटी स्टँड ला जातील.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवासस्थान, अंबिका मेस येथून भेदा चौककडे जाणारे मार्ग बंद करून पर्यायी मार्ग निश्चित.

गेट नं. 1 ते बैल बाजार रोड तसेच भेदा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या संपूर्ण मार्गावर खाजगी वाहनांचे पार्किंग बंद; हा परिसर एस.टी. बसेस व निवडणूक वाहनांसाठी आरक्षित.

कराड शहरातून कार्वेनाका, कार्वे, शेणोलीकडे जाणारी वाहने कोल्हापूर नाका–हायवे–मलकापूर–बैल बाजार रोडने जातील.

 

सवलत

रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहने, निवडणूक प्रक्रियेतील वाहने, अत्यावश्यक सेवा व शाळा बसेस यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

सदर वाहतूक बदलांची नोंद घेऊन नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तुषार दोशी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!