धुळे : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष बससेवा सुरू केली आहे. धुळे आगारातून थेट अयोध्येसाठी लालपरी धावणार असून, या सेवेमुळे खान्देशातील रामभक्तांना अयोध्येचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येसोबतच वाराणसी आणि प्रयागराज येथील धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधीही प्रवाशांना मिळणार आहे.
लालपरी आता संपूर्ण भारत दर्शनासाठी सज्ज
२,८०० किलोमीटरचा प्रवास
धुळे ते अयोध्या हे अंतर जवळपास २,८०० किलोमीटर आहे. या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बसची आसनक्षमता ४१ प्रवाशांची आहे.
किती असेल तिकीटदर?
जेव्हा ही सेवा २०२४ साली सुरू झाली तेंव्हा धुळे ते अयोध्या या विशेष बससेवेसाठी प्रतिप्रवासी ४,५४५ रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवासाचे बुकिंग साधारण १५ दिवस आधी करता येत होते. बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहितीही समोर आली होती.
अयोध्येसह वाराणसी आणि प्रयागराजचे दर्शन
या विशेष बससेवेच्या माध्यमातून भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर आणि प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाला भेट देता येणार आहे. त्यामुळे एका प्रवासात उत्तर भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
सामान्य भाविकांसाठी दिलासा
रेल्वेचे आरक्षण मिळवणे किंवा खासगी वाहनाने हजारो किलोमीटरचा प्रवास करणे अनेकांसाठी खर्चिक ठरते. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाची ही विशेष बससेवा भाविकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खान्देशातील विविध भागांतील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येण्यासाठी मार्गावर नियोजित थांबे ठेवण्यात आले होते.
