मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडत विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर हा विषय आपल्यासाठी संपला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय संपला!
दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू होती. अजितदादांनी स्वतः यासंदर्भात त्यांच्याशी तसेच पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.
‘ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी हा विषय संपला. त्यानंतर दोन-चार दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मी स्वतः या विषयावर पडदा टाकला होता,’ अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
माझ्याशी कुणीही विलीनीकरणाबाबत बोललेले नाही!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्याला अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव मिळालेला नसल्याचे सांगितले. ‘मला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे नेमके कोणत्या विलीनीकरणाबाबत बोलले जात आहे, याची मला कल्पना नाही. माझ्याशी तरी याबाबत कुणीही चर्चा केलेली नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
शरद पवारांच्या भेटीगाठींवरही स्पष्ट भूमिका
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटींचा संबंध दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाशी जोडला जात होता.
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. विविध पक्षांतील नेते त्यांची भेट घेत असतात. यापूर्वीही अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अशा भेटींमध्ये नवीन काही नाही. दरम्यान, अजित पवार गटातील काही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
सुनील तटकरे यांच्या विधानामुळे चर्चांना पुन्हा उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अलीकडे पुन्हा वेग आला होता. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चांमुळे विलीनीकरणाच्या शक्यतांबाबत राजकीय वातावरण तापले होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना ‘योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी समजतील,’ असे सूचक विधान केले होते. त्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
आता दोन्ही राष्ट्रवादींची वाटचाल स्वतंत्रच?
सुप्रिया सुळे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या शक्यतेवर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या चर्चांना त्यांच्या निधनानंतर पुढे नेण्यात आले नाही, अशी भूमिका सुळे यांनी मांडली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या स्वतंत्र राजकीय वाटचालीचा मुद्दा चर्चेत आला आहे. अर्थात, भविष्यात राजकीय परिस्थिती काय वळण घेते आणि दोन्ही पक्षांचे नेतृत्व कोणती भूमिका घेते, यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.
