पलूस : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मुख्य रस्ते, कापड दुकाने, सराफ बाजार, फटाका बाजार तसेच फळ मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. सणासुदीच्या या गर्दीचा फायदा चोरटे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API जयसिंग पाटील यांनी केले आहे.

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांच्या खिशातील मोबाईल, पाकीट, सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडू शकतात. विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान दागिने घालणे टाळावे. तसेच स्वतःची पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवावी. खरेदी करताना अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

 

बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी किंवा मूळ गावी जात असतात. अशावेळी घर बंद करून जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घराबाहेर पडताना वीज आणि सीसीटीव्ही यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करावी. घर बंद असल्याची माहिती सोशल मीडिया किंवा अनोळखी व्यक्तींसमोर जाहीर करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

पोलिसांची गस्त वाढवली; नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा

पलूस शहर आणि परिसरात अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनीही आपल्या परिसरातील घडामोडींबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. एखादी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, सणाचा आनंद घेत असताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API जयसिंग पाटील यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!