मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आता विमानाच्या पायलटबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे.
या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा रेकॉर्ड अत्यंत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. 15,000 तासांचा दांडगा अनुभव असूनही, सुमित कपूर यांचा भूतकाळ सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाने डागाळलेला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन सुमीत यांनी भूतकाळात ड्यूटीवर दारू पिऊन जाणे आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात आहे. दारू प्रकरणात कॅप्टन सुमीत यांना यापूर्वी तीन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं.
13 मार्च 2010 – दिल्ली-बंगळुरू विमान उड्डाणापूर्वी ते पहिल्यांदा दारूच्या नशेत आढळले. 7 एप्रिल 2017 – सात वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्ली-गुवाहाटी उड्डाणापूर्वी ते ‘लीकर पॉझिटिव्ह’ आढळले. दुसऱ्यांदा पकडले गेल्याने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने त्यांना कठोर शिक्षा केली.
2017 मध्ये दुसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर DGCA ने सुमित कपूर यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. कोणत्याही वैमानिकासाठी ही मोठी शिक्षा मानली जाते. निलंबन काळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उड्डाण सुरू केले आणि ‘VSR व्हेंचर्स’ या खासगी कंपनीत ते दाखल झाले. ज्या कंपनीकडे राज्यातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्यांनी सुमित कपूर यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली होती का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
