कुंडल, दि. २७ : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव तसेच आगामी सण-उत्सव पार्श्वभूमीवर कुंडल पोलिसांनी कुंडल शहर, दुधोंडी व पुणदी गावामध्ये संचलन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा व विश्वासाचा संदेश पोहोचवण्यासाठी हे संचलन करण्यात आले.

 

पोलिसांची भक्कम उपस्थिती

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. यात पोलीस उपनिरीक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस अंमलदार, २० होमगार्ड तसेच दोन मोठ्या वाहनांचा समावेश होता. मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

 

संचलनाचा मार्ग

संचलनाची सुरुवात कुंडल पोलीस ठाण्यातून झाली. तेथून पुढे कुंडल ग्रामपंचायत चौक, मुख्य बाजारपेठ, एसटी स्टँड मार्गे संचलन काढण्यात आले. दुधोंडी गावात गणेश मंदिर ते भवानी मंदिर मार्गे, तर पुणदी गावात ग्रामपंचायत चौक, मारुती मंदिर आणि मुख्य बाजारपेठेतून हे संचलन घेण्यात आले. या सर्व ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत शिस्त आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले.

 

नागरिकांना दिलेल्या महत्वाच्या सूचना

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी यावेळी नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या. धोकादायक आवाज व प्रदूषण करणाऱ्या साऊंड सिस्टीमवर बंदी असून मंडळांनी याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे त्यांनी सांगितले. तसेच लेझर लाईट शोसाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट करत, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

 

सोशल मीडियावर सामजिक भावना दुखावतील अशा पोस्ट्स टाळाव्यात, उत्सवांदरम्यान वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळावी यावरही त्यांनी भर दिला. कोणतीही समस्या उद्भवल्यास नागरिकांनी थेट कुंडल पोलिसांशी संपर्क साधावा किंवा १००/११२ या हेल्पलाईनवर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले.

 

शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन

पोलिस प्रशासनाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, गणेशोत्सव आणि सर्व आगामी सण-उत्सव शांततेत व सुव्यवस्थेने पार पडावेत यासाठी पोलिसांची उपस्थिती ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. “पोलिस जनतेच्या सेवेसाठीच असून नियमांचे पालन केल्यास कोणतीही अडचण येणार नाही,” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी सांगितले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!