कराड : शहरातील विद्यानगर (सैदापूर, कराड) परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका युवकाकडून दुचाकीवर अत्यंत कर्णकर्कश आवाज करणारा बदललेला सायलेन्सर लावून रात्रीच्या वेळी गाडी फिरवली जात होती. या प्रचंड आवाजामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर वाहतूक पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला मात्र, पोलिसांनी तात्काळ पकडवून त्याला व त्याच्या पालकास पोलिसांनी योग्य ती समज दिली. त्यानंतर त्याच्या दुचाकीवरील बेकायदेशीर व नियमबाह्य सायलेन्सर जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित युवकावर ७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की,
“शहरातील शांतता भंग होईल अशा प्रकारे कर्णकर्कश सायलेन्सर लावून वाहन चालवणे हे कायद्याने गुन्हा आहे. यापुढे जो कोणी अशा पद्धतीने नागरिकांना त्रास देईल, त्याच्यावर तात्काळ आणि कडक कारवाई केली जाईल.”
ते पुढे म्हणाले की, बदललेले सायलेन्सर केवळ कायद्याचे उल्लंघन नाहीत, तर लहान मुले, वृद्ध नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांसाठी ते गंभीर त्रासाचे कारण ठरतात. त्यामुळे अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही.
वाहतूक शाखेने यावेळी सर्व नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही प्रकारचा ध्वनीप्रदूषणाचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण मिळवता येईल, असेही पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.
