बीड : जिल्ह्यातील एक धक्कादायक बालविवाह प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत असलेला नवरदेव पोलिसांची चाहूल लागताच सुसाट पळून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी वेळेत कारवाई करत एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला आहे.
• गुप्त माहिती आणि पोलिसांची धाड
सकाळच्या सुमारास पल्लवी जाधव यांना एक गोपनीय फोन आला. दुपारी १२ वाजता कपिलधार देवस्थान (ता. जि. बीड) येथे एका १६ वर्षांच्या मुलीचा विवाह होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. माहितीची खातरजमा होताच पल्लवी जाधव या साध्या वेशात आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी दाखल झाल्या. त्या ठिकाणी दोन ते तीन विवाहसोहळे सुरू असून मोठी गर्दी होती.
• सुरुवातीला नाव चुकीचे, आडनावावरून संशय
पोलिस पथक पहिल्या हॉलमध्ये दाखल झाले. पल्लवी जाधव यांनी एका महिलेकडे नवरीचे नाव विचारले असता तिने जाणूनबुजून चुकीचे नाव सांगितले. त्यामुळे टीम बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच पल्लवी जाधव यांनी मुलीचे आडनाव विचारले. आडनाव अचूक सांगितल्याने त्यांना संशय बळावला. अधिक चौकशी केली असता संबंधित मुलगीच अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
• पोलिसांची ओळख पटताच पळापळ
पोलिस मुलीला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावताच वऱ्हाडी मंडळींना पोलिस असल्याचा संशय आला आणि एकच गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत नवरदेव राजेंद्र शिंदे हा घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, प्रचंड गर्दीतही पल्लवी जाधव यांनी प्रसंगावधान राखत पीडित मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
• बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जागृती
पळणाऱ्या व हजर असलेल्या लोकांना थांबवत पल्लवी जाधव यांनी त्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले. तसेच पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले. या प्रकरणात मुलीचे आई-वडील, मामा, तसेच नवरदेव राजेंद्र शिंदे व त्याचे आई-वडील फरार झाले असून, त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
• व्हिडीओ व्हायरल; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नवरदेव पळून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार जनजागृती करूनही असे विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश का येत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, व्हायरल झालेला व्हिडीओ देखील महत्त्वाचा पुरावा म्हणून तपासात जोडण्यात आला आहे. या घटनेमुळे बालविवाह रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
