कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचा सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेला जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय 30) यांना जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमुळे शहापूरसह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन जाधव हे भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (BEG) चे जवान होते. सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील 8 राष्ट्रीय रायफल्स (8 RR) मध्ये झाली होती. उरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईदरम्यान हॅन्ड ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात अर्जुन जाधव गंभीर जखमी झाले. सहकारी जवानांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
अर्जुन जाधव यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची बातमी समजताच शहापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले. गावातील प्रत्येकाच्या ओठांवर त्यांच्या धाडसाची आणि देशसेवेचीच चर्चा सुरू आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेले बलिदान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अर्जुन जाधव यांच्या मुलाचा 25 जून रोजी पहिला वाढदिवस आहे. आपल्या चिमुकल्या लेकाचा पहिला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी ते 15 जून रोजी सुट्टीवर घरी येणार होते. त्यासाठी कुटुंबीयांनीही तयारी सुरू केली होती. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. सुट्टीवर येऊन मुलाला मिठी मारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आणि त्याआधीच ते देशासाठी हौतात्म्य पत्करून तिरंग्यात लपेटून मायभूमीत परतले.
अर्जुन जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे आणले जाणार असून शुक्रवारी शासकीय व लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहापूरच्या या वीरपुत्राला सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून श्रद्धांजली वाहिली जात असून, त्यांच्या बलिदानाची आठवण कायम प्रेरणादायी राहणार आहे. “देशासाठी जगला आणि देशासाठीच हसत-हसत प्राण अर्पण केले”, अशा शब्दांत ग्रामस्थ आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देत आहेत.
