कराड : तालुक्यातील गोंदी गावाने पुन्हा एकदा अभिमानास्पद यशाची नोंद करत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सख्या भाऊ-बहिणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे.

 

गोंदी गावचे सुपुत्र, माजी सरपंच स्वर्गीय प्रल्हाद मारुती पवार (तात्या) यांचे नातू तथा श्री. जयवंत प्रल्हाद पवार यांची कन्या कु. आरती जयवंत पवार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात ३४ वी रॅंक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि ग्रामीण वातावरणात शिक्षण घेत असतानाही आरती पवार हिने चिकाटी, जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे गोंदी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

याच कुटुंबातील तिचा भाऊ जीवन पवार हा यापूर्वीच महाराष्ट्र पोलीस दलात पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवेत कार्यरत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी राज्य शासनाच्या सेवेत स्थान मिळवत गोंदी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी भावंडांचे अभिनंदन करताना सांगितले की, “ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीदेखील जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. या यशातून इतर तरुणांनी प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.”

 

गोंदी गावात या यशाबद्दल आनंदोत्सवाचे वातावरण असून ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून भावंडांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या या भावंडांमुळे संपूर्ण कराड तालुक्याचा अभिमान उंचावला असून अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!