कराड : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेने ठोस पावले उचलली असून, काल रात्री कोल्हापूर नाका परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

 

कोल्हापूर नाका येथे सध्या सुरू असलेल्या भराव पुलाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या परिस्थितीत रस्त्यावरच ट्रॅव्हल्स बसेस, मालवाहू वाहने आणि चारचाकी गाड्या थांबत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.

 

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, यापुढे कोल्हापूर नाका येथे कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हल्स, बसेस किंवा चारचाकी वाहने थांबविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनांनी प्रवासी चढ-उतारासाठी पाटण तिकटणे हा पर्यायी ठिकाण म्हणून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कराड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक घाडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार सत्यजित नेवसे, रतन चव्हाण, काशीद, पोलीस नाईक महेंद्र सावंत तसेच पोलीस शिपाई नवनाथ पाटील आणि भुताळे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

 

वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!