मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या कार्याला शासकीय मान्यता देत त्यांच्या 22 जुलै या जयंतीचा समावेश अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने 15 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील शासन परिपत्रक (GR) जारी केले असून, यापुढे दरवर्षी राज्यभर शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे.

 

या निर्णयानुसार मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, विभागीय आयुक्त कार्यालये, पंचायत राज संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

 

भुजबळ, मुश्रीफ यांच्या मागणीला यश

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक वाटचालीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनाने ही मागणी मान्य केली.

 

शाळा-महाविद्यालयांमध्येही कार्यक्रम

शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, प्रबोधनपर कार्यक्रम आणि स्मरण उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनाची माहिती मिळावी आणि विकासाभिमुख नेतृत्वाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

 

महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका

स्व. अजितदादा पवार यांनी तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व केले. त्यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री यांसह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली. राज्याच्या अर्थसंकल्पीय नियोजनात, सिंचन प्रकल्पांमध्ये, पायाभूत सुविधा विकासात आणि प्रशासनातील निर्णयक्षमतेसाठी त्यांची विशेष ओळख होती. त्यांची वेळेचे काटेकोर पालन करणारी कार्यपद्धती, पहाटेपासून सुरू होणारा कामाचा दिनक्रम, प्रशासनावरील मजबूत पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी प्रतिमा महाराष्ट्रभर निर्माण झाली होती.

 

निधनानंतर राज्यभर शोक

28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता. लोकभवनासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या सार्वजनिक कार्याचा गौरव केला होता.

 

22 जुलैला राज्यभर पहिली अधिकृत जयंती

यंदा 22 जुलै 2026 रोजी स्व. अजितदादा पवार यांची पहिली अधिकृत शासकीय जयंती राज्यभर साजरी होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव होणार असून, भविष्यात दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे स्व. अजितदादा पवार यांच्या राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा शासकीय स्तरावरील मोठा सन्मान म्हणून पाहिले जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!