कराड : चीन येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या प्राची अंकुश देवकर हिने ३,००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक पटकावत देशाच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची भर घातली. प्राचीने ही स्पर्धा १० मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करत आशियाई स्तरावर दमदार कामगिरीची नोंद केली.
अत्यंत साध्या आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या प्राचीने मर्यादित सुविधा, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव करत तिने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवत आशियाई स्पर्धेत थेट पदक जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी तिने केली.
स्टिपलचेस ही वेग, सहनशक्ती आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या क्षमतेची कसोटी मानली जाते. अशा आव्हानात्मक स्पर्धेत आशियातील बलाढ्य धावपटूंना कडवी झुंज देत प्राचीने संयमी आणि आक्रमक धाव घेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
प्राचीच्या या ऐतिहासिक यशाची माहिती समोर येताच किरपे गावासह संपूर्ण कराड तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राची देवकरचा संघर्षमय प्रवास आज ग्रामीण भागातील लाखो तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचा जिवंत आदर्श तिने आपल्या यशातून घालून दिला आहे. तिच्या या यशामुळे भारतासह महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील मान अधिक उंचावला असून, संपूर्ण देशाला तिच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे.
