कुंडल : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदान, कुंडल येथे झालेल्या जंगी कुस्ती मैदानात देशभरातील नामवंत मल्लांच्या चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. यंदाच्या मैदानातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या लढतीत हरियाणाचा हिंदकेसरी दिनेश गोलिया याने महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा पराभव करत मैदान गाजविले. गोलियाने २६ व्या मिनिटाला ‘घुटना’ डावावर सिकंदर शेखला पराभूत केले.
कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान हे देशभरातील नामवंत मल्लांसाठी प्रतिष्ठेचे मैदान मानले जाते. या मैदानावर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांच्या कुस्त्या झाल्या आहेत. १९५७ पासून सध्याच्या महाराष्ट्र मैदानात कुस्तीची परंपरा सुरू असून, लोकवर्गणीतून भरविले जाणारे हे मैदान कुस्तीप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.
सिकंदर शेख विरुद्ध दिनेश गोलिया; २६ मिनिटांची रंगतदार लढत
पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा हिंदकेसरी दिनेश गोलिया आमनेसामने आले. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली.
कुस्तीच्या आठव्या मिनिटाला दिनेश गोलियाने सिकंदर शेखवर ताबा मिळविला; मात्र कुस्ती मैदानाबाहेर गेल्याने ती पुन्हा लावण्यात आली. त्यानंतर सिकंदर शेखने ‘कुंडी’ डाव टाकून गोलियाला खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलियाने हा डाव चतुराईने उलटवत १९ व्या मिनिटाला पुन्हा ताबा मिळविला. अखेर २६ व्या मिनिटाला गोलियाने संधी साधत ‘घुटना’ डावावर सिकंदर शेखला अस्मान दाखविले. या लढतीसाठी प्रीतम लाड यांनी पंच म्हणून काम पाहिले.
चार महाराष्ट्र केसरी मल्लांना पराभव
यंदाच्या कुंडल मैदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चार महाराष्ट्र केसरी मल्लांना पराभवाचा सामना करावा लागला.
डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आणि भारत केसरी राजू रायवाल यांच्यातील लढत सुरुवातीला चांगलीच रंगली. हर्षद सदगीरने ताबा मिळवला; मात्र राजू रायवालने त्यातून सुटका करून घेतली. अखेर १९ व्या मिनिटाला राजू रायवालने ‘दुहेरी पट’ डावावर विजय मिळविला.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि राष्ट्रीय विजेता शुभम रायवाल यांच्यात तब्बल ४० मिनिटे झुंज झाली. अखेर शुभम रायवालने ‘एकचाक’ डावावर विजय मिळविला.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि जम्मूचा लल्लू यांच्यातील कुस्ती रेंगाळल्यानंतर गुणांवर घेण्यात आली. आठव्या मिनिटाला लल्लूला विजयी घोषित करण्यात आले.
तर दादा शेळके आणि भारत केसरी साहिल कोहली यांची कुस्ती सुरू असताना दादा शेळके यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने लढत थांबविण्यात आली. साहिल कोहलीच्या खेळीने मात्र कुस्तीशौकिनांची दाद मिळवली.
माऊली कोकाटेचा पंजाबच्या मल्लावर विजय
उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि पंजाबचा आंतरराष्ट्रीय मल्ल हदी इराण यांच्यातील कुस्ती १२ मिनिटे रंगली. हदीने घेतलेला ताबा माऊलीने दुसऱ्याच मिनिटाला धुडकावून लावला. त्यानंतर माऊली कोकाटेने ‘पोकळ घिस्सा’ डावावर विजय मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली.
सुबोध पाटील याने ‘एकचाक’ डावावर महारुद्र काळेलचा पराभव केला. वैभव माने याने राष्ट्रीय पदक विजेता सुदर्शन कोतकरवर गुणांवर विजय मिळविला. कुंडलच्या सनी मदने याने पंजाबच्या गोगीला ‘हप्पी’ डावावर चितपट केले. कुंडलच्याच ओंकार मदने याची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
दिव्यांग मल्लांचाही दमदार सहभाग
या मैदानाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते दिव्यांग मल्लांचे. आशीष मस्के, विराज पाटील (देवराष्ट्रे) आणि प्रणव पडळकर या दिव्यांग मल्लांनी आपल्या कुस्त्यांमध्ये विजय मिळवत उपस्थित कुस्तीप्रेमींची वाहवा मिळविली.
याशिवाय रोहित भोसले (पलूस), अमित चौगुले, ज्ञानदेव जाधव, विशाल शिंदे (क्रांती), अर्ष तांबोळी, प्रथमेश शिंदे, अनिकेत पाटील, कुणाल माने, रियाज मुलाणी, अजित पवार, ऋषिकेश मंडले, सुमित सूळ, नाथा पवार, भारत पवार आणि तेजस मोरे यांसह अनेक मल्लांनी चुरशीच्या लढती देत मैदानात रंगत आणली. जोतिराम वाजे यांनी समालोचनाची धुरा सांभाळली.
महिला कुस्तीतही उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व
पुरुषांच्या कुस्त्यांप्रमाणेच महिला कुस्तीतही उत्तर भारतातील महिला मल्लांनी दमदार कामगिरी केली.
जागतिक विजेती रीतिका हुड्डा हिने महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिचा गुणांवर पराभव केला.
जागतिक विजेती बिपाशा दाहिया हिने राष्ट्रीय पदक विजेत्या सई भोसले हिच्यावर ‘घिस्सा’ डावावर विजय मिळविला.
आश्लेषा बागडे हिने महाराष्ट्र चॅम्पियन रिया भोसले हिला चितपट केले तर राष्ट्रीय पदक विजेती प्रेरणा पाटील आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली त्यामुळे यंदाच्या मैदानात महिला कुस्तीमध्येही उत्तर भारतीय मल्लांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
कुंडलचे मैदान पुन्हा एकदा चर्चेत
कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान हे केवळ एक कुस्ती मैदान नसून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. या मैदानावर देशभरातील नामवंत मल्लांनी आपली ताकद आणि कौशल्य आजमावले आहे. मैदानाची रचना अशी आहे की प्रेक्षकांना कोणत्याही ठिकाणाहून कुस्तीचा थरार पाहता येतो.
यंदाच्या मैदानात महाराष्ट्रातील मातब्बर मल्लांसमोर उत्तर भारतातील मल्लांनी दिलेले आव्हान आणि मिळवलेले विजय यामुळे कुंडलचे मैदान पुन्हा एकदा राष्ट्रीय कुस्तीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
हिंदकेसरी दिनेश गोलियाचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवरील विजय, चार महाराष्ट्र केसरी मल्लांचा पराभव आणि महिला कुस्तीत उत्तर भारतीय मल्लांची दमदार कामगिरी, यामुळे यंदाचे कुंडलचे मैदान कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहणारे ठरले आहे.
