सातारा : सण-उत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ध्वनियंत्रणांच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. डीजे, लाऊडस्पीकर आदी ध्वनियंत्रणा वापरणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना अनामत रक्कम जमा करावी लागणार असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त करून शासनजमा केली जाणार आहे.
नव्या निर्देशांनुसार, वैयक्तिक कार्यक्रमांसाठी ५० हजार रुपये, तर सार्वजनिक मंडळे अथवा संस्थांसाठी १ लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील निर्धारित नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांची ही अनामत रक्कम जप्त होऊ शकते.
उत्सवाच्या काळात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करताना परवानगीतील अटी व आवाजाच्या मर्यादांचे पालन करणे आयोजकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नियमभंग झाल्यास केवळ आर्थिक कारवाईच नव्हे, तर संबंधित ध्वनियंत्रणेविरुद्धही कायदेशीर कारवाई होऊ शकते.
साताऱ्यात यापूर्वीही डीजेवर कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादा आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली होती. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी एकूण २९ मंडळांशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, २४ सप्टेंबरच्या कारवाईत सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांचा डीजे सिस्टीम व वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यामुळे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे व ध्वनियंत्रणा वापरणाऱ्या मंडळांनी परवानगीतील अटी, ध्वनिमर्यादा आणि प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक ठरणार आहे.
ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे आणि नागरिकांच्या शांततेचा अधिकार अबाधित ठेवणे, या उद्देशाने प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली जाण्याची शक्यता आहे.
