नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. उपोषण संपवताना सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा दावा करत त्यांनी, “या घटनेनंतर राजकीय नेत्यांवरील माझा विश्वास उडाला आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
26 दिवस अखंड उपोषण केल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यांना जंतर-मंतर येथून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले होते. दीर्घ उपोषणामुळे त्यांचे वजनही मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगितले जात आहे. अखेर 26 दिवसांनंतर सरकारच्या मध्यस्थीने त्यांनी उपोषण मागे घेतले.
उपोषण संपल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना सोनम वांगचुक यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उपोषण सोडण्यापूर्वी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान उपोषण सोडतानाचे कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडिओ सार्वजनिक केले जाणार नाहीत, असे मंत्र्यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते.
सोनम वांगचुक यांनी दावा केला की, बैठकीसाठी छायाचित्रकारही उपस्थित होते. मात्र, त्यांनी स्वतः फोटो प्रसिद्ध करण्यास विरोध केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, “विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि काही विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असतील, तरच हा कार्यक्रम संयुक्त स्वरूपात व्हावा, अशी माझी इच्छा होती. अन्यथा हे फोटो कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत, असे मंत्र्यांनी मला आश्वासन दिले होते.”
मात्र, काही वेळातच उपोषण सोडतानाचे फोटो सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कसे झाले हे माहिती नाही, पण काही वेळातच टीव्ही चॅनेलवर माझे उपोषण सोडतानाचे फोटो दाखवले गेले. मला दिलेले वचन पाळले गेले नाही,” असे ते म्हणाले.
सोनम वांगचुक यांनी पुढे आरोप केला की, संपूर्ण घटनाक्रम केवळ सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमाप्रमाणे सादर करण्यात आला. विद्यार्थी आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना स्थान न दिल्यामुळे हा कार्यक्रम एकतर्फी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सोनम वांगचुक यांनी केलेल्या आरोपांवर सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
