मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय टपाल विभागाने मोठी भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीअंतर्गत देशभरातील 39 पोस्टल सर्कलमध्ये एकूण 23,757 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोस्टल सर्कलअंतर्गत 2,431 पदांचा समावेश आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
या भरतीमध्ये प्रामुख्याने ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे.
ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) यांच्यावर संबंधित ब्रँच पोस्ट ऑफिसचे कामकाज तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) संबंधित कामकाजाची जबाबदारी असते. आपल्या कार्यक्षेत्रातील गाव किंवा ग्रामपंचायत परिसरातील पोस्टल व्यवसायाचे व्यवस्थापनही BPM यांच्या कामाचा भाग आहे.
असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) यांना टपाल तिकिटे व स्टेशनरीची विक्री, टपालाचे वितरण व वाहतूक, तसेच IPPB आणि इतर पोस्टल कामांमध्ये BPM यांना मदत करावी लागते.
डाक सेवक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना लाइन सब ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस तसेच रेल्वे मेल सर्व्हिसेससारख्या कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी उमेदवाराने दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित, इंग्रजी आणि संबंधित स्थानिक भाषा हे विषय असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी स्थानिक भाषा मराठी आहे. गोवा राज्यासाठी कोंकणी/मराठी भाषेची तरतूद आहे. याशिवाय उमेदवाराला संगणक, लॅपटॉप, POS किंवा मोबाइल यांसारखी उपकरणे वापरण्याचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित घोषणापत्र सादर करावे लागेल.
सायकल चालवता येणे आवश्यक
या भरतीसाठी उमेदवाराला सायकल चालवता येणे बंधनकारक आहे. सायकलऐवजी स्कूटर किंवा मोटारसायकल चालवता येत असल्यास तेही ग्राह्य धरले जाऊ शकते. यासंदर्भात आवश्यक घोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
BPM पदासाठी निवड झाल्यास संबंधित ब्रँच पोस्ट ऑफिससाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उमेदवारावर असेल. तसेच BPM पदावरील उमेदवाराला संबंधित पोस्ट ऑफिस असलेल्या गावात राहणे अपेक्षित आहे. ABPM आणि डाक सेवक पदांसाठी संबंधित पोस्ट ऑफिसच्या वितरण क्षेत्रात राहण्याची अट आहे.
वयोमर्यादा किती?
21 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 43 वर्षांपर्यंत, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना 45 वर्षांपर्यंत सवलत आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल वयोमर्यादा 50 ते 55 वर्षांपर्यंत आहे. EWS उमेदवारांना स्वतंत्र वयोमर्यादा सवलत नाही.
परीक्षा न देता गुणवत्तेवर निवड
या भरतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखी परीक्षा किंवा मुलाखतीऐवजी दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज करताना पदांसाठी दिलेला पसंतीक्रमही निवड प्रक्रियेत महत्त्वाचा असेल. अंतरिम निवड यादीनंतर आवश्यक हमीपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. भरतीची निवड प्रक्रिया 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या विभागात किती जागा?
महाराष्ट्र पोस्टल सर्कलअंतर्गत विविध विभागांमध्ये जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये धुळे 105, कोल्हापूर 107, कराड 59, सातारा 76, सांगली 100, पुणे ग्रामीण 94, रायगड 101, नागपूर ग्रामीण 119, चिपळूण 81, अमरावती 78, छत्रपती संभाजीनगर 78, सोलापूर 49 आणि सिंधुदुर्ग 76 अशा विविध ठिकाणी पदे आहेत. तसेच गोवा विभागात 130 पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासोबत गोव्यातील पात्र उमेदवारांनाही या भरतीत संधी मिळू शकते.
वेतन किती मिळणार?
ग्रामीण डाक सेवक पदांसाठी TRCA (Time Related Continuity Allowance) पद्धतीने मानधन दिले जाते.
– BPM : ₹12,000 ते ₹29,380 TRCA
– ABPM/डाक सेवक : ₹10,000 ते ₹24,470 TRCA
याशिवाय केंद्र सरकारच्या नियमानुसार महागाई भत्ताही लागू राहतो. उपलब्ध भरती तपशीलानुसार BPM साठी अंदाजे ₹19,200 आणि ABPM/डाक सेवकांसाठी अंदाजे ₹16,000 मासिक TRCA नमूद करण्यात आला आहे.
अर्ज शुल्क किती?
खुल्या प्रवर्गातील, OBC आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क आहे.
महिला, SC, ST, दिव्यांग आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून 21 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्जाचे अधिकृत संकेतस्थळ : “India Post GDS Online Engagement” (https://reference-url-citation.invalid/11)
ही भरती ग्रामीण डाक सेवक (GDS) Schedule-II, जुलै 2026 अंतर्गत असून, पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे, स्थानिक भाषा, पदांची उपलब्धता आणि इतर अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक तपासावी.
