रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता वस्त्रसंहितेचे पालन करावे लागणार आहे. मंदिराचे पावित्र्य, धार्मिक वातावरण आणि शिस्त कायम राखण्याच्या उद्देशाने मंदिर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांची १ जानेवारी २०२७ पासून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

गणपतीपुळे हे धार्मिक स्थळासोबतच प्रसिद्ध समुद्रकिनारा असल्याने येथे वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक दाखल होत असतात. अनेक पर्यटक समुद्रकिनारी फिरल्यानंतर त्याच वेशभूषेत मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या धार्मिक वातावरणाला अनुरूप पोशाख असावा, यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या वेशभूषेत मंदिरात प्रवेश मिळणार नाही?

मंदिर प्रशासनाच्या सूचनेनुसार गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेस, शॉर्ट्स तसेच अतिशय तोकडे किंवा समुद्रकिनाऱ्यासाठी वापरले जाणारे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसेच आक्षेपार्ह मजकूर किंवा चित्रे असलेले कपडे परिधान करून दर्शनासाठी येणेही टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या वेशभूषेत येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासोबतच मंदिरात दर्शन घेण्याचा बेत असलेल्या पर्यटकांनी मंदिरात प्रवेश करताना योग्य आणि सभ्य पोशाख परिधान करण्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

 

१० वर्षांखालील मुलांना सूट

या वस्त्रसंहितेत १० वर्षांखालील मुलांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांसह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या कुटुंबांना या नियमातून सवलत मिळणार आहे.

 

जनजागृतीनंतर आता कडक अंमलबजावणी

मंदिर संस्थानकडून वस्त्रसंहितेबाबत यापूर्वीही भाविक आणि पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. मंदिर परिसरासह परिसरातील हॉटेल्स आणि लॉजमध्येही या नियमांची माहिती देण्यात आली आहे. मात्र नियमांबाबत अधिक स्पष्टता आणि पालन सुनिश्चित करण्यासाठी आता त्यांची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ जानेवारी २०२७ पासून वस्त्रसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असल्याने गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानकडून करण्यात आले आहे.

गणपतीपुळे मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असून येथे देशाच्या विविध भागांतून भाविक येतात. त्यामुळे मंदिराचे धार्मिक स्वरूप आणि पावित्र्य जपण्यासाठी भाविकांनी मंदिराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन संस्थानच्या पंचकमिटीकडून करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!