पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त पुण्यातील बाणेर येथील यशदा येथे पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात देश-विदेशातील पर्यटन, संस्कृती आणि वारसा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. लघुपटांच्या प्रदर्शनासोबतच मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास यांसारखी संवादात्मक सत्रेही महोत्सवात आयोजित करण्यात आली आहेत.

महोत्सवाचे प्रमुख संयोजक व परभन्ना फाउंडेशनचे प्रमुख गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. चित्रपट उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील परस्पर संबंध अधिक दृढ करणे, तसेच चित्रपट विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, ट्रॅव्हल क्रिएटर्स, व्लॉगर्स आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणे हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

३० हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन

यंदाच्या महोत्सवासाठी लघुपट, माहितीपट, व्लॉग आणि विद्यार्थी चित्रपट अशा विविध विभागांतून प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. अंतिम निवड झालेल्या ३० हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन महोत्सवादरम्यान केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, या संकल्पनेवर महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे.

 

विविध पुरस्कारांनी होणार गौरव

महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट, उपविजेता, विशेष परीक्षक उल्लेख आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांसह माहितीपट व व्लॉग विभागातील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विद्यार्थी विभागात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट, माहितीपट आणि व्लॉगसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत.

याशिवाय प्रवासवर्णन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचा गौरव केला जाणार असून, महाराष्ट्र पर्यटन आणि वारी पर्यटनासाठी विशेष सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.

 

चित्रपट आणि पर्यटन क्षेत्रातील उपस्थिती

महोत्सवाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ संपादक संजय आवटे, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष सचिन इटकर यांच्यासह चित्रपट आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या परीक्षक म्हणून वैशाली केंदळे, संतोष पठारे आणि अनमोल कोठाडिया यांनी काम पाहिले आहे.

 

सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत कार्यक्रम

दोन दिवस चालणारा हा महोत्सव सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर आणि नागपूर येथून प्रेक्षक व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

चित्रपट निर्माते, कलाकार, लेखक, छायाचित्रण दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन व्यावसायिक तसेच पर्यटनप्रेमींसाठी हा महोत्सव संवाद आणि ज्ञानविनिमयाचे व्यासपीठ ठरणार आहे.

“चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांना एका व्यासपीठावर आणणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!