पुणे : पर्यटनाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी चित्रपट व लघुपट हे प्रभावी माध्यम ठरू शकतात. पर्यटन आणि चित्रपटनिर्मिती ही परस्परपूरक क्षेत्रे असून, या माध्यमातून युवा दिग्दर्शकांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांनी या संधींचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते ओम राऊत यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाऊंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथील यशदा येथे आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ओम राऊत यांना ‘परभन्ना विशेष योगदान पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे आणि माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच विहार ट्रॅव्हल्सचे दीपक पुजारी यांना ‘परभन्ना जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने ऋषिकेश पुजारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट कृषी पर्यटन पुरस्कार चंद्रपूर येथील मधुबन अ‍ॅग्रो टुरिझमला प्रदान करण्यात आला.

चित्रपटांमधून पर्यटनाला मिळू शकते नवी दिशा

पर्यटन आणि चित्रपट ही दोन्ही क्षेत्रे माणसाला नवे अनुभव देतात, त्याच्या जाणिवा समृद्ध करतात आणि संवेदनशील बनवतात, असे ओम राऊत यांनी नमूद केले. चित्रपटांच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, स्थानिक परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली प्रभावीपणे जगासमोर मांडता येते. त्यामुळे पर्यटनाच्या प्रचारासाठी चित्रपट व लघुपटनिर्मितीला विशेष महत्त्व असल्याचे या महोत्सवातून अधोरेखित झाले.

ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी सर्जनशील निर्मितीमध्ये आशय सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. लघुपट तयार करताना विषयाचे वेगळेपण आणि त्यातील आशय जपण्याचे आवाहन त्यांनी नवोदित निर्मात्यांना केले.

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी पर्यटनाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. आजची नवी पिढी केवळ पर्यटनस्थळांना भेट देण्याऐवजी त्या ठिकाणचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव घेण्यास प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता असून, तेथील वैशिष्ट्ये अचूकपणे ओळखून त्यांचे ब्रँडिंग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांत २६ लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन

‘चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रसार’ या संकल्पनेवर आधारित हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात लघुपट आणि माहितीपटांच्या प्रदर्शनासोबत मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास यांसारख्या विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसांत एकूण २६ लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन झाले, तर निवडक ५० छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.

लघुपट, माहितीपट, व्हीलॉग आणि विद्यार्थी चित्रपट अशा विविध विभागांत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महोत्सवामुळे पर्यटन क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण विषय चित्रपटांच्या माध्यमातून मांडण्याची संधी नवोदित दिग्दर्शकांना मिळाली.

‘केकी’ आणि ‘द रिकार्ड डान्स’ला पुरस्कार

महोत्सवातील पुरस्कारांमध्ये विविध कलाकृतींनी बाजी मारली. ‘केकी’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. ‘द रिकार्ड डान्स’ आणि ‘एकोज ऑन द वॉल्स’ या माहितीपटांना सर्वोत्कृष्ट माहितीपट विभागात प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द लास्ट पॅरेडाईज’ आणि ‘होड्यांचे गाव’ या माहितीपटांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला.

उत्कृष्ट व्हीलॉगचा पुरस्कार ‘द शॅटर्ड मिरर्स ॲन एपिफनी’ आणि ‘वास्टर बीर’ यांना मिळाला. विद्यार्थी विभागात ‘अलक’ या माहितीपटाला, तर ‘द व्हॉईस ऑफ ओल्ड’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार देण्यात आला.

माहितीपट विभागातील उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नीलेश कुंजीर, तर लघुपट विभागात तुषार उडेग यांची निवड करण्यात आली. ‘कोकणातील शाश्वत पर्यटन’ आणि ‘दिंडी – वे ऑफ लाईफ’ या कलाकृतींना महाराष्ट्र पर्यटन विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. परीक्षकांचा विशेष पुरस्कार ‘लीगसी इन ट्यून्स’, ‘आगम’ आणि ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ या कलाकृतींना देण्यात आला.

नव्या चित्रपटनिर्मात्यांना संधींचे आवाहन

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले आणि यापुढेही सहकार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण यांनी नव्या चित्रपटनिर्मात्यांनी चित्रनगरीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. परीक्षक डॉ. अनमोल कोठडिया आणि वैशाली केंदळे यांनीही नव्या दिग्दर्शकांनी निर्मितीच्या विविध शक्यता तपासून पाहण्याची गरज व्यक्त केली.

महोत्सवाचे प्रमुख संयोजक गणेश चप्पलवार, संस्थेच्या सचिव मनीषा उगले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोप सोहळा पार पडला. ज्येष्ठ पत्रकार जयश्री बोकील यांनी मानपत्राचे लेखन व वाचन केले, तर अमित त्रिभुवन यांनी आभार मानले. आरजे तेजस्वी फुलसुंदर आणि प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

 

पर्यटनस्थळांची ओळख जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी चित्रपट आणि लघुपट हे प्रभावी माध्यम ठरू शकतात. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन, संस्कृती आणि सर्जनशील चित्रपटनिर्मिती यांचा संगम घडवून आणण्याबरोबरच नवोदित दिग्दर्शकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!