विशेष वृत्त : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर पश्चिम आशियातील तणाव काहीसा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच लाल समुद्र परिसरात परिस्थिती अद्यापही अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. येमेनमधील हुती बंडखोरांकडून लाल समुद्रातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांना सातत्याने लक्ष्य केले जात असून, आता प्रथमच भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावरही भीषण हल्ला करण्यात आला आहे.

 

४ ऑगस्ट २०२६ रोजी लाल समुद्रातील येमेनच्या किनारपट्टीजवळ भारतीय मालवाहू जहाज एमएसवी फैज नूर ओलिया (MSV Faiz Noor Oliya) यावर अचानक हल्ला करण्यात आला. हल्ला इतका भीषण होता की जहाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि अखेरीस ते समुद्रात बुडाले.

 

१३ भारतीयांसह सर्व १४ नाविकांची सुखरूप सुटका

हल्ल्यावेळी जहाजावर एकूण १४ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी १३ जण भारतीय नागरिक होते. घटनेची माहिती मिळताच येमेन तटरक्षक दलाने तातडीने बचाव मोहीम राबवली आणि सर्व नाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. सध्या सर्व नाविकांना येमेनमधील मोखा (Mocha) बंदरात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या बचाव मोहिमेमुळे मोठी जीवितहानी टळली.

 

भारत सरकारचा तीव्र निषेध

भारतीय जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारत सरकारने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या घटनेचा निषेध करत म्हटले की,

“भारतीय जहाजावर झालेला हा विनाकारण आणि भ्याड हल्ला आहे. भारत या घटनेचा तीव्र निषेध करतो. आमच्या नागरिकांची आणि नाविकांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

 

परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत निवेदन जारी करून या हल्ल्याचा तीव्र धिक्कार केला आहे. रियाधमधील भारतीय दूतावास यमनमधील संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून सर्व भारतीय नाविकांना आवश्यक ती मदत पुरविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल भारताने येमेन प्रशासन आणि तटरक्षक दलाचे आभारही व्यक्त केले आहेत.

 

लाल समुद्रातील वाढता धोका

गेल्या काही महिन्यांपासून लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हुती बंडखोरांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. अमेरिका-इराण संघर्षानंतर या भागातील तणाव आणखी वाढला असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सागरी वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना असल्याने भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दा उपस्थित

भारत सरकारने या हल्ल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जहाजे आणि भारतीय नाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे लाल समुद्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जागतिक सागरी मार्गांवरील वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!