पुणे : राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांची लगबग सुरू असतानाच, मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. बारामतीतील त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून सोमवारी दुपारी ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांच्या ताफ्यासोबत कार्डियाक ॲम्बुलन्सही आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मात्र Ajit Pawar यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये उपस्थित होते. या कालावधीत झालेल्या प्रचंड दगदगीचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे नेमकं कारण
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास असून श्वास घेण्यास अडचण जाणवत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी मास्क लावून वेगळ्या वाहनातून पुण्याकडे प्रयाण केले. सकाळपासूनच डॉक्टरांचे पथक गोविंद बागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.
सततचा दिनक्रम आणि थकवा
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बारामतीत दाखल होत आहेत. सहयोग सोसायटीत दादांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर बहुतांश जण गोविंद बागेत शरद पवार यांचीही भेट घेत आहेत. जवळपास आठ दिवस हा दिनक्रम अखंड सुरू असल्याने शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, पुण्यातील रुग्णालयात शरद पवार यांच्यावर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून पुढील उपचार करण्यात येणार असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून लवकरात लवकर ते बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.
