कराड : वाहनांचा आवाज वाढवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर किंवा प्रेशर हॉर्न बसवणे, नंबर प्लेटला मनमानी आकार देणे अथवा वाहनाच्या मूळ रचनेत नियमबाह्य बदल करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेने मंगळवारी विविध ठिकाणी विशेष नाकाबंदी करून धडक कारवाई केली. या कारवाईत दिवसभरात तब्बल १७५ वाहनचालकांवर कारवाई करत १ लाख ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कराडजवळील सैदापूर परिसर, विद्यानगर तसेच कराड शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विशेष नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहा बुलेट मोटारसायकलींचे नियमबाह्य सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच पाच फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करण्यात आली आणि १५ प्रेशर हॉर्नवर पोलिसांनी कारवाई केली. वाहनांचा आवाज वाढवून रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांवरही वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेतली.
वाहतूक शाखेच्या म्हणण्यानुसार, वाहनांमध्ये कंपनीने निश्चित केलेल्या मूळ रचनेत अनधिकृत बदल केल्यास वाहनाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः प्रेशर हॉर्न आणि कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊ शकते. तसेच नियमबाह्य नंबर प्लेटमुळे वाहनाची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
वाहतूक नियम हे केवळ दंडात्मक कारवाईसाठी नसून वाहनचालक आणि रस्त्यावरील इतर नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणे टाळावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी केले.
कराड शहरातील वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनांमध्ये केलेले मॉडिफिकेशन नियमांच्या चौकटीत आहे की नाही, याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणावे, असा संदेश या कारवाईतून वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
