कराड : मॉडिफाइड सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश हॉर्न आणि अनधिकृत सायरन वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कराड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत २८१ मॉडिफाइड सायलेन्सर, १७० फॅन्सी नंबर प्लेट, १८३ प्रेशर हॉर्न आणि ४३ सायरन अशा एकूण ६७७ नियमबाह्य बाबींवर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मॉडिफाइड सायलेन्सरचा कराड येथील महाविद्यालयीन परिसरात बुलडोझर चालवून चुराडा करण्यात आला.
कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविद्यालयीन परिसरात मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहने चालविण्याचे प्रकार निदर्शनास येत होते. त्याचबरोबर नियमबाह्य नंबर प्लेट, मोठ्या आवाजाचे हॉर्न आणि अनधिकृत सायरन यांचाही वापर होत असल्याने पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.
“मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत, यासाठी ते बुलडोझरखाली नष्ट करण्यात आले,” अशी माहिती राजश्री पाटील यांनी दिली.
महाविद्यालयीन परिसरातील कारवाईचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः तरुणांनी वाहनांमध्ये अनावश्यक आणि नियमबाह्य बदल करण्यापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. नियमबाह्य सायलेन्सर, नंबर प्लेट, हॉर्न किंवा सायरनचा वापर केल्यास भविष्यातही दंडात्मक तसेच कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
नियम पाळल्यास कोणतीही अडचण नाही; मात्र नियमांचे उल्लंघन करून इतरांना त्रास होत असेल तर कारवाई केली जाईल.
असा स्पष्ट संदेश कराड पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.
दरम्यान, कराड शहरातील वाहतूक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
