कराड : कराड शहरात सावकारीच्या कथित छळाला कंटाळून ४५ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या वसुलीसाठी सातत्याने फोन, शिवीगाळ, धमकी आणि पैशांचा तगादा लावला जात असल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

मृत व्यक्तीचे नाव दिलीप रामचंद्र मुळीक (वय ४५) असे असून ते वाघेरी येथील हॉटमिक्स सिमेंट कंपनीत काम करत होते.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मुळीक यांनी आर्थिक गरजेतून विनायक मुळे याच्याकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेची परतफेड केल्यानंतरही त्यांच्याकडे ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास स्टॅम्प आणि चेकच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मुळीक यांनी बशीर पठाण याच्याकडूनही ५० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या रकमेवर ९ टक्के व्याज आकारले जात असल्याचा आरोप असून, कर्जाच्या वसुलीसाठी त्यांची दुचाकी बळजबरीने ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दोन्ही व्यक्तींकडून कर्जाच्या पैशांसाठी सातत्याने फोन करून शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याने मुळीक मानसिक तणावाखाली होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

२१ ऑगस्ट रोजी कामावर जात असल्याचे सांगून मुळीक घराबाहेर पडले. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले. गंभीर अवस्थेत ते स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान २९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीतून सावकारीच्या कथित छळाचे प्रकरण समोर आले.

पत्नीच्या तक्रारीवरून कराड शहर पोलिसांनी विनायक मुळे आणि बशीर पठाण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!