कराड, दि.९ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी युवकास २० वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांन्वये १ लाख ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. होरे यांनी ठोठावली असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ॲड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली. महेश दादाराव मांजरे, वय ३० रा.कार्वे नाका, कराड, मूळ रा.कवडगाव, माजलगाव, जि. बीड असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत ॲड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेली माहिती अशी, महेश मांजरे याने जुन २०१५ मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना तिला वारंवार तू मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो तसेच माझ्याबरोबर प्रेम संबंध ठेवण्यास तू नकार दिल्यास मी मारून टाकीन, तुझ्या घराच्यांची वाट लावीन व स्वतः जीव देईन, अशी भोती घातली तसेच धमकी देऊन अल्पवयीन पीडित मुलीबरोबर बरोबर गैरकृत्य करण्याच्या हेतूने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मार्च २०१६ मध्ये जबरदस्तीने तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटे काढून ते इतरांना दाखविले. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी पी. व्ही. जाधव यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात खटला सुरू असताना सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सौ. शहा यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. सरकारी वकिलाचा युक्तिवाद, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या सारक्षींबरोबरच पीडितेची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली.न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश के. एस. होरे यांनी आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरी व विविध कलमान्वये एक लाख ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यात ॲड. राजेंद्र सी. शहा यांना ॲड. कोमल लाड यांनी मदत केली तसेच सहाय्यक फौजदार ए.के.मदने, पोलीस हवालदार जी. जी. माने यांनीही अड. राजेंद्र सी. शहा यांना सहकार्य केले.
