कराड: शहरातील मारुती बुवा कराडकर मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे २३ एप्रिल २०१९ रोजी मठामध्ये असताना बाजीराव मामा कराडकर हा आरडा ओरड करीत त्या ठिकाणी आला. त्याने तेथील लाकडी विना उचलून घेतली तसेच दिंडी कशी काढतात ते बघतो असे म्हणत लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत त्याने विना त्याच्या डोक्यात घातली. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले. मठात असलेल्या मोहन चव्हाण व अशोक शिंगण यांनी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले दरम्यान याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीराव मामा कराडकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत व उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांनी तपास करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात ॲड. राजेंद्र सी शहा यांनी काम पाहिले त्यांनी अकरा साक्षीदार तपासले त्यापैकी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते तसेच डॉक्टरांची साक्षही महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने बाजीराव मामा कराडकर याला या गुन्ह्यात दोषी धरत सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला ॲड. कोमल लाड यांनी सहकार्य केले. या निर्णयामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
