उंडाळे/कराड:म्हासोली (ता. कराड) येथील शिवारात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास कोरवाडा परिसरात घडली.
जखमी झालेला शेतकरी महादेव गणपती पाटील (५५) यावेळी शेतात कामासाठी गेला होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यात पाटील यांच्या हातावर आणि छातीला गंभीर जखमा झाल्या. आसपासच्या शेतकऱ्यांच्या मदतीमुळे तो बिबट्याच्या पंज्यातून वाचला. त्यानंतर त्याला उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणाने गावात आणि शेजारच्या शिवारात भीती पसरली आहे. गेल्या काही दिवसांत या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत आहे. पाळीव जनावरांवर हल्ले होत असतानाच आता माणसांवर हल्ला झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतित आहेत. यामुळे वनखात्याकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
