नाशिक: नाशिकच्या कुंभनगरीत एका २८ वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची मोठी घटना समोर आली आहे. १९ ते २३ मार्च दरम्यान घडलेल्या या प्रकरणात पीडितेने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीशी वादानंतर महिलेची धडपड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परजिल्ह्यातील या महिलेचा पतीशी कौटुंबिक वाद झाल्याने ती नाशिकमध्ये आली होती. रात्री पंचवटी परिसरात असताना सहा आरोपींनी तिला फसवून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवले आणि भक्तनिवासात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पीडित महिलेने धैर्य दाखवून पोलिसांकडे धाव घेतल्याने प्रकरण उघडकीला आले आहे.
ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
या बरोबरच, नाशिकजवळील ओझर टाउनशिपमध्ये एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचीही घटना नोंदवण्यात आली आहे. आई कामावर गेल्यानंतर घरात एकटी असलेल्या मुलीवर आरोपींनी हल्ला केला आणि प्रकरण उघडकीला आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातही पोलिसांनी BNS आणि POCSO कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम-६५(२), ७०(२), ३३२ (ब), ३५१ (३) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपाययोजना
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींच्या शोधासाठी पोलिस तपास चालवत आहेत. पंचवटी पोलिस ठाण्यातर्फे पहिल्या प्रकरणाचा छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याशी ताळमेळ करून चौकशी सुरू आहे, तर ओझरमधील प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस दबाव आणणार आहेत.
या घटनांमुळे नाशिकमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
