सातारा : नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर राज्यातील पहिला ‘म्युझिकल रोड’ तयार करण्यात आला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला गेला आहे. या रस्त्यावरील सजावटी दिव्यांमध्ये स्पीकर लावून, पहाटेच्या वेळी भक्तिसंगीत वाजवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना एक अनोखा आध्यात्मिक अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या आधी हा मार्ग खड्ड्यांनी भरलेला असल्याने वाहतुकीसाठी त्रासदायक होता. मात्र, नगरोत्थान योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांच्या तरतुदीत या रस्त्याचे पुनर्बांधणी करण्यात आली. ए.एस. देसाई इन्फ्रा कंपनीने केलेल्या या कामगिरीचे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक कौतुक करत आहेत.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या म्युझिकल रोडचे औपचारिक उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, “हे केवळ एक रस्ता नसून, साताऱ्याच्या विकासाचे प्रतीक आहे. यामुळे शहराचे सौंदर्य वाढेल आणि नागरिकांना सुखद अनुभव मिळेल.”
या प्रकल्पामुळे साताऱ्यातील एक जीर्ण रस्ता आता आधुनिक व सौंदर्यपूर्ण बनला आहे. याशिवाय, संगीतमय वातावरणामुळे सकाळच्या वेळात येथे येणाऱ्यांना शांतता आणि आनंदाचा अनुभव येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.