सांगली: भाजपमध्ये सध्या सर्वाधिक वादग्रस्त चर्चेत असलेले नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. सतत आक्रमक भूमिका, कडवे हिंदुत्ववादी विचार आणि वादग्रस्त विधाने यामुळे ते सतत चर्चेत राहतात. मुस्लीम व ख्रिश्चन समाजावर केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका होते. याचा फटका थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही बसतो.

 

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनातील मारहाणीच्या घटनेनंतर तर पडळकर यांची राज्यभरात मोठी नाचक्की झाली. सभागृहासमोर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आमदार माजलेत” असा रोखठोक इशारा दिला होता. पडळकर यांच्या हिंदू मोर्चांनंतर दंगलसदृश वातावरण निर्माण होते, असे आरोपही वारंवार होतात. मात्र त्यामागे असलेला धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शरद पवार, अजित पवार यांच्या विरोधातील आक्रमकता हे पडळकर यांचे “उपद्रव मूल्य” ठरले.

 

मात्र आता भाजपने सांगली जिल्ह्यातून पडळकर यांना पर्याय शोधल्याचे बोलले जात आहे. नुकतेच माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वयाच्या नव्वदीतील या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहिले. ही उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच पक्ष सोडून गेलेले जुने भाजपवालेही पुन्हा घरी परतत आहेत, असा संदेश फडणवीस यांनी दिला.

 

याचवेळी ॲड. चिमणराव डांगे यांना प्रोत्साहन देण्यासाठी आण्णा डांगे यांनी फडणवीस यांच्याकडे शब्द टाकल्याचे सांगितले जाते. अण्णा डांगे यांची भाजपच्या माधव पॅटर्नमधील जुनी ओळख असल्याने भाजपने इस्लामपूर भागात शैक्षणिक संस्था, सूतगिरणी अशा योजनांद्वारे त्यांना आधीपासूनच बळ दिले आहे. त्यामुळे डांगे यांच्या माध्यमातून धनगर समाजाबरोबरच इतर समाजाचाही जनाधार भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

 

राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या सोबत अनेक वर्षे राजकारण करणारे चिमणराव डांगे आता भाजपमध्ये धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून उदयास येत आहेत. फडणवीस यांनीही त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिल्याचे म्हटले जाते. जिल्ह्यातील धनगर समाज काही प्रमाणात भाजपसोबत आधीच आहे. पण डांगे यांच्या प्रवेशामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळल्याचे संकेत मिळत आहेत.

 

आता भाजप गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त प्रतिमेच्या पलीकडे, एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा म्हणून चिमणराव डांगे यांना कसे उभे करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!