कराड: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आगामी गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य व संरक्षक बचाव दल यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृहात विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात वाहतूक सुरक्षा अधिकारी अजित सांडगे यांनी पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस मित्रांची जबाबदारी, त्यांचे कार्य आणि नागरिकांसाठी त्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी कराड शहर पोलीस दल आगामी गणेशोत्सवात शांतता, संयम आणि सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेणार असल्याचे सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल व दक्ष नागरिक पोलीस मित्र एकत्रितपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले यांनी पोलीस मित्रांच्या कार्याचा आढावा घेत सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे जाणवले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सन्मानही करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव दत्तात्रय जाधव, प्रमोद बाबर (सातारा जिल्हा बंदोबस्त अधिकारी), ईश्वर कारंडे (सातारा जिल्हा निरीक्षक), सुहास पाटील (प्रशिक्षक), अमित पाटील, राजेंद्र माळी, जगन्नाथ साळुंखे, अनिल पाटील, रमेश चव्हाण, अनुराधा पाटील, साधना राजमाने, स्वाती सूर्यवंशी, मनोज पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरामुळे कराड शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल आणि दक्ष नागरिक पोलीस मित्र सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले.
