सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला आहे. मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. कोयना धरणापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू असल्याने कोयनानगर परिसरात हा धक्का प्रकर्षाने जाणवला, मात्र इतर भागांत तो जाणवला नाही. सुदैवाने या भूकंपामुळे कोयना धरण सुरक्षित असल्याची खात्री धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्येला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होता. कोयना धरण परिसर भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून आधीपासूनच ओळखला जातो आणि त्यामुळे वारंवार सौम्य धक्के बसत असतात. या धक्क्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही तसेच पाटण तालुक्यातील इतर गावांत पडझड किंवा नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
याआधीही कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. याच वर्षी 15 ऑगस्ट रोजी, ऐन स्वातंत्र्यदिनी, दुपारी 2:45 च्या सुमारास 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. त्यावेळी केंद्रबिंदू धरणापासून सुमारे 41 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील तानमळा गावाजवळ होता. त्याआधी 5 जानेवारीला 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप नोंदवला गेला होता.
पाटण तालुका हा भूगर्भीय हालचालींमुळे संवेदनशील क्षेत्र असून, कोयना धरण परिसरात सातत्याने लहानमोठे भूकंप होतात. त्यामुळे या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी विशेष भूकंपमापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या भागात नवनवीन उपकरणे बसविण्यात येत असून, यामुळे भूगर्भातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल. या उपक्रमामुळे कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
सतत होत असलेल्या या भूगर्भीय हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता व्यक्त होत असली, तरी तज्ज्ञांच्या मते हे धक्के धरणाला धोका पोहोचवणारे नाहीत. मात्र, यांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
