कराड : समाजासाठी आपले आयुष्य वाहून घेऊन खंबीरपणे कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नवीन पायवाटा तयार करणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी यंदापासून “नवदुर्गा पुरस्कार” या विशेष सन्मानाची सुरुवात करण्यात आली आहे. मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी यांच्या तर्फे या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून यंदा प्रथमच या सन्मानाने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, मंगल आबा आवळे, आराध्या अमोल कदम, विनिता भारत कुंभार, ज्योती अधिकार पवार, सविता अशोक लातूर, प्रसन्ना अभिजीत धामणे व अश्विनी हणमंत वेताळ यांचाही समाजातील विविध घटकांमध्ये कौतुकास्पद व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सर्व महिलांनी आपल्या कार्यातून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. काहींनी शिक्षण व महिलांच्या सबलीकरणासाठी झटून काम केले तर काहींनी सामाजिक न्याय, आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

ॲड. पद्मजा मिलिंद लाड यांनी कायद्याच्या क्षेत्रात महिलांच्या हक्कांसाठी उभे राहत उल्लेखनीय काम केले. समाजाच्या विविध स्तरातून कायदेविषयक प्रबोधन करणे, गोर गरीब घटकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, POCSO कायद्या संदर्भात सरकारी पक्षास सहकार्य, कौटुंबिक प्रश्नांचे समुपदेशनाच्या माध्यमातून निराकरण आशा समाजाभिमुख कार्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. महिलांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितले कि “संसाराचा गाडा चालवत संवेदनशीलपणे सामाजिक भान राखणारी प्रत्येक स्त्री ही माझ्यासाठी नवदुर्गा आहे” तेंव्हा उपस्थित महिलांमधून टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या या वक्तव्याचे कौतुक केले.
पी. एन. गडगीळ ज्वेलर्स ही दागिन्यांच्या क्षेत्रातील १८३२ पासूनची एक ऐतिहासिक व विश्वासार्ह परंपरा आहे. पुण्यात सुरू झालेला हा व्यवसाय आज देशभरात तसेच परदेशातही आपली छाप पाडत आहे त्यामुळे PNG ज्वेलर्स म्हणजे परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम असं दागिन्यांचं घराणं आहे.
PNG ज्वेलर्स कडून या सर्वांचा गौरव “नवदुर्गा पुरस्कार” देऊन करण्यात आला असून, हा पुरस्कार यावर्षीपासून सुरू झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजातील स्त्रीशक्तीच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सन्मान पुढील काळातही महिलांना अधिक प्रेरणा देणारा ठरणार आहे.
लक्षवेधी
कार्यक्रमावेळी महिलांनी डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे होणाऱ्या त्रासाची व्यथा अनुभवकथनातून मांडली. याबाबत पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील व ॲड. पद्मजा लाड यांनी चर्चेतून लोकांनीच पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत अशा त्रासदायक गोष्टी टाळल्या पाहिजेत, असे स्पष्ट केले. लोकांनी डॉल्बी ऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देऊन आपली संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळली जात असली तरी प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून अशा सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
