जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरताना नळीच्या सहाय्याने तोंडाने डिझेल ओढल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सलीम गुलाब तडवी (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी पहाटे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम तडवी हे आपल्या कुटुंबासह पिंप्री फत्तेपूर येथे वास्तव्यास होते. ट्रॅक्टर चालवून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. नेहमीप्रमाणे १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता ते आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना कॅनमधील डिझेल टाकण्यासाठी नळीचा वापर करीत होते. नळीने डिझेल ओढत असताना अचानक दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल त्यांच्या तोंडातून थेट पोटात गेले. काही क्षणांतच त्यांना उलटी, मळमळ व तीव्र अस्वस्थता जाणवू लागली.

 

प्रकृती झपाट्याने खालावली

डिझेल पोटात गेल्याचे लक्षात येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तात्काळ सलीम तडवी यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, डिझेलमुळे शरीरात विषबाधा पसरत गेली. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती गंभीरच राहिली. अखेर रविवारी पहाटे १२.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

सलीम तडवी यांच्या निधनाची बातमी कळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अवघ्या ३४ व्या वर्षी कुटुंबातील कर्ता पुरुष हरपल्याने पिंप्री फत्तेपूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सलीम तडवी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता आधार गेल्याने तडवी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

अकस्मात मृत्यूची नोंद

या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नळीच्या सहाय्याने तोंडाने डिझेल किंवा पेट्रोल ओढून वाहनात इंधन भरण्याची अत्यंत धोकादायक पद्धत पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा प्रकारांमुळे गंभीर अपघात होऊ शकतात, त्यामुळे वाहनचालकांनी सुरक्षित साधनांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञ व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!