पुणे : पुण्याचे माजी खासदार, रेल्वेचे माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष अशी बहुआयामी ओळख असलेले ज्येष्ठ नेते श्री. सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे मंगळवार, ६ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात शोककळा पसरली आहे.
गेल्या दीर्घ काळापासून विविध आजारांशी झुंज देत असलेले सुरेश कलमाडी यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर अखेर मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. केंद्र सरकारमध्ये रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते.
पुणे शहराच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर त्यांनी काम केले. पायाभूत सुविधा, वाहतूक, क्रीडा व सार्वजनिक सोयी-सुविधांच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. केंद्र व राज्याच्या राजकारणात त्यांचा स्वतंत्र ठसा होता. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते समर्थकांमध्ये लोकप्रिय तर टीकाकारांमध्ये चर्चेचा विषय राहिले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा व सून, दोन विवाहित मुली, जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज, मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत एरंडवणे येथील ‘कलमाडी हाऊस’ येथे नागरिक व मान्यवरांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, पुण्याच्या राजकीय इतिहासात सुरेश कलमाडी यांचे नाव कायम स्मरणात राहील, अशा प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
