पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रचाराला चांगलाच वेग आला असून प्रभाग क्रमांक २७ (क) नवी पेठ-पर्वती परिसरात पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. अक्षदा प्रेमराज गदादे पाटील यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नुकतीच पार पडलेली भव्य प्रचार फेरी नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरली.

या प्रचार फेरीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज, जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजघटक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीमुळे परिसर दुमदुमून गेला होता.

प्रचारादरम्यान उमेदवार अक्षदा गदादे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.

“नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, पारदर्शक कारभार करणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा माझा संकल्प आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रभाग २७ (क) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रचार फेरीला मिळालेला प्रतिसाद हा पक्षासाठी सकारात्मक संकेत मानला जात असून, येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!