पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याचे चित्र दिसून आले होते. प्रचारादरम्यान आमदार लांडगे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते, तसेच त्यावरून आक्रमक प्रत्युत्तरही दिले जात होते.

 

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आकुर्डी येथील सभेत आमदार महेश लांडगे यांनी आपला सूर बदलत एक पाऊल मागे टाकल्याचे स्पष्टपणे दिसून आले. “माझी आणि अजित पवार यांची उंची कधीच बरोबरीची होऊ शकत नाही. ते राज्याचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

 

२०१७ नंतर पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास

सभेत बोलताना आमदार लांडगे यांनी भाजपच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. २०१७ मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे त्यांनी सांगितले. या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्कम पाठबळ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणे, प्राधिकरणाच्या तब्बल ९८ हजार मालमत्ता फ्री-होल्ड करणे, ५२ वर्षांनंतर साडेबारा टक्के परतावा देणे, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर करणे तसेच न्यायालयासाठी स्वतंत्र इमारतीला मंजुरी देणे, ही सर्व महत्त्वाची कामे भाजप सरकारच्या काळात झाल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

 

आरोपांना दिले प्रत्युत्तर, महायुतीतील आदराचा मुद्दा उपस्थित

आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, “माझ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करणाऱ्यांना मी दोन दिवसांत योग्य प्रकारे उत्तर दिले आहे.” महायुतीतील नेत्यांचा आदर केवळ भाजपनेच करायचा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यावर भाजपने संयम दाखवला, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनापासून काम केल्याचा दावा केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील इतर भागांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असतानाही त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत, मात्र भोसरी मतदारसंघातून मोठे मताधिक्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही अजित पवारांकडून विनाकारण खोटे कथानक पसरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

एसआरए धमक्यांवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) माध्यमातून नागरिकांना धमकी दिली जात असल्याचा मुद्दा आमदार लांडगे यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली.

“मी गृहमंत्री असताना एसआरएच्या नावाखाली धमक्या देण्याची हिंमत कोणाची होते? येथे कायद्याचे राज्य चालेल. धमक्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. कोणी धमकी देत असेल तर पोलिस सक्षमपणे उत्तर देतील,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

एसआरएचे अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः असल्याचे सांगत, नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

महापौर भाजपचाच होणार – लांडगे

सभेच्या शेवटी आमदार महेश लांडगे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!