दिल्ली : देशभरात एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून, आता दोन सिलिंडर बुकिंगदरम्यान किमान २१ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यापूर्वी हा कालावधी १५ दिवसांचा होता. त्यामुळे ग्राहकांना एका सिलिंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २१ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो घरगुती गॅस ग्राहकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एलपीजी गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ६० रुपयांची वाढ झाली आहे, तर १९ किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडणार असल्याचे बोलले जात आहे.
एलपीजी गॅस बुकिंगसंदर्भातील हा नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आला असून, गॅस एजन्सींच्या सिस्टीममध्ये त्यानुसार बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक एजन्सींमध्ये सॉफ्टवेअर लॉक करण्यात आले असून २१ दिवस पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा सिलिंडर बुक करता येणार नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्यांच्या गॅस एजन्सींवर हा नियम लागू होणार आहे.
दरम्यान, वर्षभरात गॅस सिलिंडर खरेदी करण्याच्या मर्यादेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या नियमांनुसार घरगुती ग्राहकांना वर्षभरात १२ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. याशिवाय तीन अतिरिक्त विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करता येतात. म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत एका ग्राहकाला एकूण १५ सिलिंडर खरेदी करता येतात.
नवीन नियमामुळे आता ग्राहकांना गॅसचा वापर अधिक काळजीपूर्वक करावा लागणार आहे. विशेषतः ज्या कुटुंबांमध्ये गॅसचा वापर जास्त आहे, त्यांना दोन सिलिंडर ठेवण्याचा पर्याय किंवा वापराचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. गॅसच्या वाढत्या किंमती आणि बुकिंग नियमांमधील बदल यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
