नाशिक : स्वयंघोषित ज्योतिष आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सुरू असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तपास अधिक तीव्र होत चालला आहे. अटकेनंतर विशेष तपास पथक (एसआयटी) त्याची कसून चौकशी करत असून, या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

 

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून, प्रकरणाचा विस्तार आता कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आहे. खरातचा मुलगा हर्षवर्धन याचीही एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, त्याची पत्नी कल्पना खरात ही गेल्या दोन दिवसांपासून फरार असून, तिचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. ती देशाबाहेर किंवा राज्याबाहेर पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी तिच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी केली आहे.

 

दरम्यान, तपास पथकाने कल्पना खरात हिच्या माहेरी, सिन्नर तालुक्यातील पाडली येथे भेट दिली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. लग्नानंतर कल्पनाने आपल्या माहेराशी पूर्णपणे संबंध तोडले होते. तिच्या नातेवाईकांच्या मते, ती कधीही माहेरी आली नाही आणि अशोक खरात तिला येऊ देत नव्हता. तिचे माहेरचे कुटुंब अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगत असून, ते तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

 

याशिवाय, शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप कल्पना खरातवर ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. तपासात केवळ पती-पत्नीच नव्हे, तर कल्पनाच्या दोन भावांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

 

या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असून, केवळ अशोक खरात आणि त्याची पत्नी यांच्यापुरते हे प्रकरण मर्यादित न राहता त्यांच्या नातेवाईकांपर्यंतही पोहोचले आहे. आगामी काळात या प्रकरणातील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!