मुंबई : भारतामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे ‘एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग’चा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः ‘ग्लीडन’ या डेटिंग ॲपने देशात 5 मिलियन युजर्सचा टप्पा पार केला असून, भारत हा या प्लॅटफॉर्मसाठी वेगाने वाढणारा बाजार ठरत आहे. फ्रान्समध्ये 2009 मध्ये सुरू झालेलं हे ॲप खास करून विवाहित व्यक्तींना गुप्तपणे (discreet) संबंध ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. या ॲपमध्ये प्रायव्हेट चॅट, अॅनॉनिमस प्रोफाइल आणि सुरक्षित संवाद यांसारख्या सुविधा दिल्या जातात. विशेष म्हणजे महिलांसाठी वापर मोफत ठेवण्यात आला आहे, तर पुरुषांसाठी पेड मॉडेल आहे.
भारतामधील आकडेवारी पाहिली तर या ॲपवर पुरुषांचे प्रमाण सुमारे 65 टक्के आहे, मात्र गेल्या दोन वर्षांत महिलांच्या सहभागात मोठी वाढ झाली असून तो सुमारे 148 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून येत आहे. युजर्सचा विचार केला तर बहुतेक लोक 30 ते 45 वयोगटातील असून ते विवाहित किंवा दीर्घकालीन नात्यात असतात. यामध्ये कॉर्पोरेट कर्मचारी, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या प्रोफेशनल लोकांचा मोठा सहभाग आहे. भारतात बेंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये या ॲपचा सर्वाधिक वापर होत असला तरी लखनऊ, सूरत, भोपाळ यांसारख्या टियर-2 शहरांमध्येही याचा वापर वेगाने वाढताना दिसत आहे.
या ॲपचा वापर प्रामुख्याने दुपारच्या मोकळ्या वेळेत (12 ते 3) आणि रात्री उशिरा (10 ते 12) केला जातो, ज्यावरून युजर्स हा प्लॅटफॉर्म गुप्तपणे वापरत असल्याचं स्पष्ट होतं. लोक अशा ॲप्सकडे वळण्यामागे वैवाहिक जीवनातील भावनिक अंतर, वेळेचा अभाव, नवीन अनुभवांची इच्छा आणि सोशल मीडियामुळे वाढलेली सहजता ही कारणं सांगितली जातात. काही सर्व्हेनुसार भारतातील जवळपास 40 टक्के विवाहित लोकांनी डिजिटल अफेअर असल्याचं मान्य केलं आहे.
या सर्व घडामोडींमुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिक विवाहसंस्था, नात्यांतील विश्वास आणि नैतिकता यावर याचा काय परिणाम होईल, याबाबत विविध मतप्रवाह दिसत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा लोक केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक समाधान आणि समजून घेणारा साथीदार शोधण्यासाठी अशा प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यामुळे ‘ग्लीडन’सारख्या ॲप्सची वाढ ही केवळ एक ट्रेंड नसून भारतातील बदलत्या नातेसंबंधांची आणि सामाजिक मानसिकतेची स्पष्ट चिन्हे मानली जात आहेत.
