कराड : येथील सामाजिक कार्याच्या अविरत सुरु असलेल्या प्रवासाला संघटित स्वरूप प्राप्त करून देऊन समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठी आशेचा नवा दीप प्रज्वलित करत

‘नील आशा सोशल वेलफेअर फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे १ एप्रिल २०२६ रोजी प्रेरणादायी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. ‘समर्पण समाजासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही संस्था समाजपरिवर्तनाच्या दिशेने ठाम पाऊल टाकत असून, सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत होणार आहे.

 

या संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा ॲड. सौ. पद्मजा मिलिंद लाड यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीतून आणि त्यांच्या संस्कारांच्या प्रेरणेतून ही संस्था उभी केली आहे. कै. अनिल व कै. आशा यांच्या मूल्यांचा वारसा जपत, “मुली सुद्धा आपल्या आई-वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकतात,” हा विश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.

 

गेल्या बारा वर्षांपासून कायदा क्षेत्रात कार्यरत असलेल्या ॲड. सौ.लाड यांनी महिलांचे समुपदेशन, कौटुंबिक वाद सोडवणे आणि कायदेविषयक जनजागृती या माध्यमातून समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कराड येथील कृष्णा पुलावरील संरक्षण जाळीचा प्रश्न त्यांनी उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

 

संस्थेच्या कार्यकारिणीत विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि समर्पित सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाचा सोशल मीडिया महामित्र पुरस्कार प्राप्त उपाध्यक्ष श्री अमित पाटील हे सोशल मीडियाच्या प्रभावी आणि सकारात्मक वापरातून समाजप्रबोधन करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

 

सचिवपदी क्रांतिभूमी कुंडल येथील स्वातंत्र्य लढ्याचा व देशसेवेचा वारसा लाभलेले तसेच हमाल पंचायत कराड चे ज्येष्ठ नेतृत्व व चळवळीचे कार्यकर्ते स्व.जयसिंगराव लाड (गुरुजी) यांचे नातू कराडचे सुपुत्र ॲड. श्री मिलिंद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकार्याचा वारसा लाभलेले श्री शेखर कोरे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, डॉ. प्रिया खार्गे (वैद्यकीय), श्री वैभव घाग (फोटोग्राफी) आणि सौ. सोनाली हेजीब (शैक्षणिक) हे सदस्य विविध क्षेत्रांतून संस्थेच्या उपक्रमांना बळ देणार आहेत.

 

संस्थेचा दीर्घकालीन उद्देश म्हणजे वयोवृद्धांसाठी सन्मानाने जीवन जगता येईल असा आदर्श वृद्धाश्रम उभारणे हा आहे. याशिवाय, समाजातील दुर्बल व पिडीत घटकांना आधार देणे, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आणि जनजागृतीच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणणे, यावर संस्थेचा विशेष भर राहणार आहे.

 

ही संस्था सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारसरणीवर आधारित असून, महान नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि समाजाभिमुख कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्याचा संस्थेचा मानस आहे. याच प्रेरणेतून कराड येथील प्रीतीसंगम परिसरातील त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन संस्थेची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे या कार्याला एक भावनिक व प्रेरणादायी अधिष्ठान लाभले.संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणून यशवंत हायस्कुल कराड येथे विद्यार्थी वर्गाने आयोजित ‘बाल बाजार’ या उपक्रमास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 

कराडपुरती मर्यादा न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला असून, भविष्यात देश आणि विदेश पातळीवरही सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी विविध मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!