कराड : शहरातील शिंदे हॉस्पिटलसमोर शनिवारी पहाटे घडलेली धक्कादायक घटना सुरुवातीला अपघात वाटत असली, तरी अवघ्या काही तासांत कराड शहर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत त्यामागे थरारक खुनाचे षड्यंत्र असल्याचा दावा केला आहे. जलसंपदा विभागातील वरिष्ठ अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) यांच्या मृत्यूमागे त्यांच्या पत्नी आणि मेहुण्याचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, या प्रकरणाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय ३६, सध्या रा. कार्वे नाका, कराड) आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक केली आहे.

अपघात की खून?

शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मृताची पत्नी सुरेखा मंडले यांनीही पोलिसांना त्याच प्रकारची माहिती दिली. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला.

सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडले रहस्य

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले हे पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना एका कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग व इतर साहित्य घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

मात्र यानंतर घडलेली घटना अधिक धक्कादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात असे आढळले की काही वेळानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी परतले आणि गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर पुन्हा वाहन घालून त्यांना ठार मारल्याचा आरोप आहे.

महिनाभरापूर्वीच रचला होता कट?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक आणि वैवाहिक वादातून हा कट रचण्यात आला. सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनी सुमारे महिनाभरापूर्वीच लक्ष्मण मंडले यांच्या खुनाचे नियोजन केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या कटासाठी दोन जणांना सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही तपासातून पुढे आली आहे. या सुपारी किलर्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत असून पुढील तपास सुरू आहे.

मृत अभियंत्याची कारकीर्द

लक्ष्मण मंडले हे जलसंपदा विभागातील अनुभवी अधिकारी होते. ते मूळचे मनव येथील रहिवासी होते. कराड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती.

मागील वर्षी त्यांची पदोन्नतीवर शहापूर (जि. ठाणे) येथे उपविभागीय जलसंपदा अधिकारी म्हणून बदली झाली होती. कामानिमित्त ते शहापूर येथे कार्यरत असले तरी त्यांचे कुटुंब कराड येथे वास्तव्यास होते.

पोलिसांची वेगवान कारवाई

घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत कराड शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रकरणाचा उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

परिसरात खळबळ

एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आणि त्यामागे पत्नी व मेहुण्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा यामुळे कराडसह सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सुपारी घेणाऱ्या संशयित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!