कराड : कराड शहर पोलीस ठाण्याने अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत ९५. ७८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त केला असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १८. ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती एमडी विक्रीसाठी वारुंजी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात गुप्तपणे पाळत ठेवून संशयित वाहनावर छापा टाकला. या कारवाईत समीर गुलाब शेख, नजर महंमद आरिफ मुल्ला आणि फरदीन दादापीर शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून ९५.७८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे बाजार किंमत २ लाख ८७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली. एकूण १८ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या रॅकेटमागील इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे कामही पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अमली पदार्थांविरोधात कराड शहर पोलिसांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून युवकांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
