कराड : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड बुलेट दुचाकींविरोधात कराड शहर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत उनाडगिरी करणाऱ्यांना चपराक दिली असून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

या मोहिमेदरम्यान वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून (मॉडिफिकेशन) कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या सुमारे 15 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.

कराड शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घाडगे, पोलीस हवालदार 254 काशीद, हवालदार 895 गोकुळ हादगे, हवालदार 1057 कोळी, महिला पोलीस हवालदार 2190 अश्विनी सूर्यवंशी, पोलीस हवालदार मर्ढेकर, पोलीस शिपाई शशी घाडगे व आशिष पाटील या पथकाने सैदापूर, विद्यानगर व परिसरात विशेष मोहीम राबवली.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत ही मोहीम राबवण्यात आली होती.

 

यापुढेही मूळ वाहनात बेकायदेशीर बदल करून, मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कराड शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

 

युवकांना आवाहन..

कराड शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व बेकायदेशीर मॉडिफिकेशन केलेल्या वाहनांवर यापूर्वीही पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात आली असून, यापुढे यापेक्षाही अधिक कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या कारवायांमुळे संबंधित युवकांच्या वैयक्तिक प्रतिमेला धक्का बसतोच, पण त्यांच्या कुटुंबीयांनाही समाजात मान खाली घालावी लागते. युवकांच्या या उनाडगिरीचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर होत असल्याने अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदार नागरिक म्हणून वर्तन करणे ही काळाची गरज असून, युवकांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!